मराठी
६६८. वर्षप्रतिपदा
चला, प्रभूला गाउ चला,
उगवे सकलां सुखकारी मला
नववर्षाचा दिन पहिला .
उगवे सकलां सुखकारी भला ... ध्रु
जग हें उपवन परमेशाचें,
रोपण येथें वयोलतेचें
करी, जला दे तोच तिला.
उगवे सकलां सुखकारी भला ... १
ख्रिस्त हिचा कनवाळू माळी
किती मायेनें थिजला पाळी
बाप मुला प्रभू तेवीं हिला
उगवे सकलां सुखकारी भला ...२
करा हर्ष, प्रेमाने नाचा
धरोनिया कर प्रिय ख्रिस्ताचा,
फुलांफला घ्या, द्या सकलां
उगवे सकलां सुखकारी भला ...३
नवे नवे हिज अंकुर यावे
नांवें हिने मधुरूप धरावें,
या प्रभूला अजि प्रार्थू चला
उगवे सकलां सुखकारी भला ...४
---- ना. वा. टिळक