मराठी
६८४. परमेश्वराचे स्तवन
तव देवा करितों स्तवनाला
स्तवितों म्हणतो प्रभू तुजला ... ध्रु
सकल धरा हि तुजला भजते
सनातनाला पितयाला
पवित्र ईश्वर, पवित्र ईश्वर,
पवित्र सेनाधव रमला ... १
दूत सकल हे व्योमी,
सत्ता करिती उन्नत घोषाला
करुबीम हे, सराफीम हे
ह्याच करिती गानाला ... २
तव विभवाच्या तेजें भरले
अशेष द्यावापृथिवीला
दिव्य प्रेषित, संदेष्ट्यांचा
गण गातो स्तुतीगीताला ... ३
धवल वसन बल साक्षीजनांचे
वाही तुजला स्तुतीमाला
पवित्र एक्लेसीया जगांतील
अर्पी तुज सन्मानाला ... ४
प्रताप ज्याचा अमित निरंतर,
तया तुला प्रिय जनकाला
प्रिय एकुलत्या, आदरणीय , सत्य
आशा ताव पुत्राला ... ५
कैवारी जो पवित्र आत्मा
स्तवितों त्याला त्रितयाला
कैवारी जो पवित्र आत्मा
स्तवितों त्याला त्रितयाला ... ६
हे ख्रिस्ता, तुज राजा गणूनी
गौरव नमीं तव चरणाला ... ध्रु
पुत्र सनातन तुन पितयाचा
सिद्ध जना तारायाला
कुमारीच्या उदराचा तुजला ख्रिस्ता,
वीट न रे आला ... ७
तूं नांगीनें विरहित केले
हे प्रभू येशू मरणाला
श्रद्धावंतांकरितां ख्रिस्ता
उघडिलें स्वद्वाराला ... ८
तूं पितयाच्या पूर्ण गौरवीं
वसशी उजव्या बाजूला
येशील न्यायाधीश होऊनि
धरितों आम्ही श्रद्धेला ... ९
अमोल रक्तें तुवा मोकळे
करून घेतलें प्रभू ज्यांला
त्या दासांचे साह्य करी
ह्या करितों आम्ही विनतिला ... १०
गणीं पवित्रामध्यें आपुल्या,
नित्य गौरवी गण त्याला
गणीं पवित्रामध्यें आपुल्या,
नित्य गौरवी गण त्याला ... ११
तार आपुले लोक, दे प्रभो
आशी अपुल्या वतनाला ... ध्रु
शासी त्याला, करीं तयांच्या
प्रभो निरंतर उन्नतीला
अनुदिन आम्ही थोर थोर
बा थोर थोर गणितों तुजला ... १२
युगानुयुग तव मधुनामाच्या
करितों जयजयकाराला
प्रसाद कर कीं, पापापासून दूर ठेवी
आजी आम्हाला ... १३
प्रभो दया कर, प्रभो दया कर,
तुजवर धरितो आशेला
होवो, राहो दया, पदीं तव
मम आशेचा भर सगळा ... १४
कदापी लज्जित व्हावे ऐसा
वेळ न येऊ दे मजला
प्रारंभी होता, तो आहे,
भविष्यातहीं भरलेला ... १५
गौरव त्या पितया पुत्राला,
द्यावें पवित्र आत्म्याला
गौरव त्या पितया पुत्राला,
द्यावें पवित्र आत्म्याला ... १६
---- ना. वा. टिळक