मराठी
६८७. देवाचें स्तवन
जयजयकार करा सकल जन,
जयजयकार करा ... ध्रु
ज्यांनी ज्यांनी स्वीय निवासें
भूषित केली धरा ... १
गात गात या सहर्ष पुढतीं
सेवा परमेश्वरा ... २
देव एक परमेश्वर केवळ
निश्चय जाणा पुरा ... ३
तयाचेच हो आपण, अपुला
तोच निर्मिता खरा ... ४
प्रजा तयाची तोच वागवी
कुरणांतील मेंढरा ... ५
स्मरुनी अवघ्या उपकारांनां
द्वारी त्याच्या शिरा ... ६
स्तवन पूर्ण होऊन अंगणीं
या त्याच्या संचरा ... ७
धन्य म्हणा हो नाम त्याचें
उपकारानां स्मरा ... ८
सर्वोत्तम परमेश सनातन
दयानिधी तो खरा ... ९
युगानुयुग सत्यता तयाची
सदैव ती निश्चरा ... १०
गौरव पितया, गौरव पुत्रा
पवित्र आत्म्या पुरा ... ११
प्रारंभी होता जो, आहे,
असेलही सर्वदा ... १२
----- ना. वा. टिळक