मराठी
६९२. क्रुसावरील दिव्य
खांबातें खिळिलें तुला गुरुवरा,
तूं साहसी यातना
द्वेषातें त्यजूनि अरिस्तव अहा,
मागें क्षमादान ना
नैराश्ये तिमिरी जगांत जगणें,
दुसाध्य झालें जरी
ताराया नूरला कुणीही प्रभुजी,
ऐशा खलांना तरी ... १
मातेची दिनरात तूच करीशी,
चिंता अगा ईश्वरा
प्रेमाचा दीधलास पाठ सकलां,
आम्हां अशा पामरा
दुःखाचें बसतात डाग हृदया
व्याकुळ होशी मनीं
त्यागींशी मजला असें वदुनियां,
होई पित्या तूं धनी ... २
दुष्टाने तुज खांबीं आंब दिधली,
सोशी असह्या छळा
कांटयांचा शिरी भूषवी किरीट तो,
राजा अहा खिळला
कालाचा महिमाही पूर्ण सरला,
होतो जगा वेगळा
सोपीं तो मम देह जीव सगळें,
हो तारितां तूं मला .. ३
तोडिले अवघेंही पाश मरणा,
सामर्थ्य तुझें नुरे
आनंदे नटली धरा प्रभूवरा,
मोडा न सीमा उरे
झालें हर्षित दुःख दीन दुबळे,
अंधार सत्ता सरे
नावीन्या जगतीं भरोनि उरती,
चैतन्य अंगी भरे ... ४
पापाचें अवघेंही राज्य सरले,
त्राता जगां उद्धरी
झालेले उपकार सर्व स्मरुनी
सारे नमा सत्वरी
मृत्यूचा लय जाहलाच पुरता,
येशू उभा ठाकला
क्रूसाचा जय मंजुघोष अवघा,
दाही दिशां उठला ... ५
----- वि. कृ. गायकवाड