मराठी
६९३. ख्रिस्ताचे वधस्तंभावरील सात उद्गगार
सुजाण हो घ्या ऐकुनी महान
स्तंभावरचे सात शब्द जे
वदला प्रभू भगवान ... ध्रु
वदला प्रभुजी प्रथम वचातें
जेव्हां खिळीती पिशुन तयातें
करी क्षमा तूं बापां यातें
हे अजुनी अज्ञान ... १
अनुतापी खल शरणची येतां
शब्द दुजा बोले प्रभू त्राता
आजदिनी मजसंगे त्रस्ता
असशील स्वर्गी जाण ... २
स्तंभाजवळी रडतां पाही
कलोपस्त्रीसह आपुली आई
तिसरा शब्द वदे,
बघ बाई पुत्र तुझा, योहान ... ३
बुडली अवनी जेव्हां तिमिरी
चवथा शब्द वदे अशुभारी
माझ्या देवा त्याग कां तरी
केला आज न जाण ... ४
पूर्ण सकल हो प्रभू अवलोकी
पूर्ण व्हाव्या शास्त्रलेख कीं
शब्द पांचवा बोलुनी टाकी
लागे मजसी तहान ... ५
देतां आंब तया, ती प्राशुनी
शब्द सहावा बोले जगधनी
पूर्ण जाहलें आपुल्या वदनी
स्तंभी विभूसंतान ... ६
हे बापा मी तुझिया हाती
निज आत्मा सोपवितों अंती
काढुनी स्तंभी अशी अंत्योक्ति
सोडी प्रभू निजप्राण ... ७
----- प्र. शा. रणदिवे