मराठी
६९४. प्रथमोद्दगार
करीं क्षमा या जना बापा
करिती काय न समजे त्यांना ... ध्रु
क्रुसावरती खिळिले ज्यांनी
बोल न लावी त्या प्रभुवाणी
विनवोनि परी देवालागूनी
करीतसे याचना ... १
सौजन्याचा कळस न हा कां
क्रुसि खिळिलें धरुनी हेकां
प्रेमाने त्या बघणें लोकां
काय म्हणु या गुणा ... २
प्रभो, देतसें क्रुसीं तुला मी
करीं अनन्वित छळहि नेहमीं
अजाणतां हें देऊं कशी हमी
अगा सूक्ष्मलोचना ... ३
तरी प्रभो मज आहे अनुभव
प्रेमलतेचा, करुणेचा तव
क्षमा याचना हि माझ्यास्तव
असे भरवसा मना ... ४
---- ना. दा. पंडित