मराठी
७०२. उत्तम शुर्क्रवार
प्रेमाविण सारा भास
प्रेम सावरे जगतास
प्रेमाचा झाला कळस
मनुजकुळीं ये जगदीश
प्रेममूर्त जगिं अवतरले
मुक्तिपथा दावून गेलें
मुक्तिपथाचें दर्शक साचें
चिन्ह क्रूसाचे
मुमुक्षुला पूर्ती ठावी
जादू वसे जी ह्या नांवी ... १
अहंकार पुरता जिरला
गेलें मीपण अस्ताला
स्वार्थाचा लवलेश नुरे
परहित हेचिं ध्येय खरें
भेदभाव जाई विलया
समान हो अवघी दुनिया
समानतेचें सहिष्णुतेचें सुखशांतीचें
निशाण हे कैवल्याचें
फडकतसे जगतीं साचें ... २
उज्ज्वल नमुना सेवेचा
ह्याहून नच गवसायाचा
नच केवळ मित्रांकरिता
अर्पी प्राणा रिपुकरितां
देवाशीं नातें अमुचें
वत्साचें नच दासाचे
ह्या तत्वाने स्वानुभवाने आत्मगुणाने
भरियले अवघ्या जगतां
क्रुसाची हि हीच कथा ... ३
समर जाहले घनघोर
झाला विजयी प्रभू वीर
निर्दालन पापात्म्याचें
हनन पुरें ततसैन्याचें
करुनि, झेंडा रोवियला
षडीपुगण उधळून दिला
विजयश्रीने हर्षभराने गातच गाणे
घातली प्रभुकंठी माला
जयस्तंभ हा स्थापियला ... ४
---------------- अ. भा. त्रिभुवन