७१७. ख्रिस्तजयंतीचिं फुलें

मराठी

७१७. ख्रिस्तजयंतीचिं फुलें ख्रिस्त जन्मला आज ख्रिस्त जन्मला फेर धरूं, गाऊं, नाचू , या ग या चला ... ध्रु मेषपाल होते कोणी मेंढरां राखीत रानीं तेज क्षणार्धी फाकले नभोमंडला ... १ भयभीत तेवीं झाले कां हो भितां दूत बोले येथें पातलो सांगाया वृत्त तुम्हांला ... २ दाविदाच्या नगरांत, बेथलेहेम शहरांत, तुम्हां तारायाला पहा बाळ जन्मला ... ३ आणि तुम्हां हीच खूण बाळनंत्याने गुंडाळून गव्हाणींत प्रभू बाळ निजवियला ... ४ थवा दूतांचा ठाकला सुस्वरें गाऊं लागला चहुंकडे गीत नाद व्योमी घुमला ... ५ कृपा पावला तो नर अवनीस शांती वर सदा सर्वदा गौरव स्वर्गी इशाला ... ६ गेले बेथलेहेमा झणीं बाळा पाहूनियां मनी मागुतें पातले गौरवीत देवाला ... ७ तारा पाहुनिया कोणी साधू येति पूर्वेहूनि सोनें, गंध, ऊद, बोळ अर्पिती बाळा ... ८ घन निळं अंबरांत चंद्र चांदणी चौकांत तारांसवें प्रभू प्रितगानी रंगला ... ९ वारा वाहे मंद मंद सौगंधें ह्या झाल्या धुंद दाही दिशा पाहा ग ह्या मंगल काला ... १० पक्षीगण गाणें गात तारकांच्या स्वागतार्थ मंजुळ मंजुळ गीत, ऐकु या चला ... ११ बहरल्या फुलवेली पुष्पांची खैरात झाली उधळि प्रभूवरीं हि मेदिनी बाला ... १२ मंगल ख्रिस्तजयंती मंगलसें गान गाती सर्व आपणही गाऊं या ग या चला ... १३ ----------------- यशवंत दिवे