मराठी
७२९. ख्रिस्त हाच विसांवा
सजे निखिल विश्व् हें रुचिरता जना दाखवी
रवी तपनदिप्तीतें विसरुनी जना रंजवी
अमोघ सुख भोगिती स्थिरचरादि भूपालसे
तरी मम जिवा कसा क्षणभरी विसांवा नसे ... १
निशासमयिं झाकतां नयन घोर निद्राभरें
जरी सुखद स्वप्न त्याला अवसरीं मनीं संचरे
सतेज कनकावली मजसमीप मातें दिसे
तरी मम जिवा तुझ्याविण प्रभो विसांवा नसे ... २
सुधाकरप्रभा हरी श्रम, समीर मोदें डुले
विहंगमकलस्वरें जगतसौख्यही वर्धिलें
तरी मज गमे जळे अखिल विश्व् चणढांशूसे
प्रभो, तुजविणें मला तीळभरी विसांवा नसे ... ३
महिपती बनूनियां कनकर्मचकी बेसलों
जरी स्वजठरार्थ याचक बनुनिया हिंडलों
तरी मजसी एक हें, सकल दृश्य गा शुन्यसें
प्रभो तुजविना कुठें तरी जगिं विसांवा नसे ... ४
अशांत हृदयिं करींतव निवास मज्जीवना
सूखार्नावविवर्धना मज करीं धरीं पावना
तुझ्या विमल कांतीनें हृदय हें करीं शुद्धसें
अगा प्रभूवरा, खरा मजसी हा विसांवा दिसे ... ५
--------------- म. दा. पाटोळे