मराठी
७४१. ईशस्तवन
हिरे मणिकें कुणीं उधळली
तेजोमय गगनी
फुलें मधुर हि जणु पसरली
कोमल तृणशयनी ... ध्रु
तारांगण हें पराकारणें ज्याने नटविले
व्योमधरेला रजनीपतीच्या तेजें सजविले
अमूप सुंदर किती असे तठ्यासाद ना ठावें
चित्र तयाचे अल्प कल्पूनि रंगूनियां जावें
कुंजवनाला खगस्वरानें
मोहकता ये, विलोल किरणें
मृगजल बनलें हें आठविणें
दिसे उदक तें जणूं चालली
वेगाने तटिनी
अहा परेशा कुणास न कळे
अतुल तुझी करणी ... १
रंग मनोहर गंध ठेविला गोड असा सुमनी
शीतलता तरुलतामंडपीं सांठविली वीजनि
पयोनिधी, सीमा बनविल्या, क्षारोदकलहरी
नर्तन करिति, तरंग तरती, हास्य दिसे अधरीं
वर्षांकाली मेघ धरेला
जीवन देउन शुष्कपणाला
विलया नेतो, तापही हरला,
पूर्व दिशेच्या अंकावरुनी
उठला हो तरणी
अहा परेशा कुणास ना कळे
अतुल तुझी करणी ... २
अवनी तव हि, ग्रहावली तव,
तुझेंच हें सगळें
चालक एकच तूं सकलांचा
त्याला तुज सकल कळें
ध्वान्तहरा मज हात देउनी
उध्दर पतिताला
भवाबिंध माझी नाव अल्प हि,
पार करीं हिजला
विमल तुझें तें तेज निरंतर
पडो विकल ह्या देहलतेवर
पत्र पुष्प फलमंडीत हिज कर
किती धूर्ता सांठविली तव प्रभुजी संघटनी
ठेव अल्प मी आपत्र जरीही
उदार तव स्मरणी ... ३
------------------- मी. दा. पाटोळे