मराठी
७४२. खऱ्या प्रीतीची खरी हीच रीत
दूर गगनी हांसतां चंद्रकोर
पहा भरती सागरा येई थोर
दूर काया परी मनें एक होतीं
खऱ्या प्रीतीची खरी हीच रीती ... १
होई गोचर अंधास दृश्य दिव्य
अरसीकांतेंहि स्फुरे महाकाव्य
पंगू लंघन गिरी, येई हि प्रचीति
खऱ्या प्रीतीची खरी हीच रीती ... २
तोयबिंदूला नसे जगिं मोल
रीती शुक्तीहि तयापरी फोल
हृदीं धरितां त्या तीच करीं मोतीं
खऱ्या प्रीतीची खरी हीच रीती ... ३
पुढें ज्याच्या सेवार्थ सदा सिद्ध
त्रिलोकीचे समृद्ध भव्य राज्य
देवपुत्रा त्या रूप मर्त्य देती
खऱ्या प्रीतीची खरी हीच रीती ... ४
--------- अ. दे. टिळक