मराठी
७५१. धनसंपत्तीचा मोह
तरुण उत्साहीं प्रभूंपाशी येई
उल्हसित होई पुसे त्यासी ... १
गुरुजी वरून शाश्वत जीवन
मिळावें म्हणून काय करूं ... २
प्रभू म्हणे पाळ आज्ञा सर्वकाळ
तेणेंच होशील जीवन्मुक्त ... ३
आज्ञांचे पालन करितों खंड न
काय आणखीन करूं सांग ... ४
आतां करी एक, आहेस धनिक
जा जा सारे वीक दीनांसाठीं ... ५
टाक ते देऊन चाल ये मागून
संसार सोडून, चल पाहूं ... ६
धनसंपत्तीला मोह, तरुणाला
आडवाची आला स्वर्गमार्गी ... ७
घालुनिया मान खालीं तो तरुण
गेला डावलून प्रभुपथ ... ८
-------- वि. कों. लोंढे