मराठी
७५४. ख्रिस्ती यत्न करणाऱ्यांची प्रार्थना
जेथें जेथें गरज दयाळा
असेल जगिं, तेथें तेथें
सेवक अपुले धाडून देई
प्रेमनिधे, तुज आवडते ... ध्रु
कोण कोण मम दूत होउन जाईल
म्हणशील परात्परा
पाठव, पाठव मला असूं दे,
अशीच अमुची तरी गिरा
तव संदेशा द्याया
प्रेरित कर अमुच्या हृदयातें
पवित्राग्नीच्या स्पर्शे अमुच्या
सिद्ध करिं बा ओष्ठांतें ... १
शब्द तुझा ऐकावा देवा
चुकुं नये हे दे दान,
तयापुढें मोलाचा वाटो
कदा न आम्हांला प्राण
तुझ्या कृपेनें तुझ्या बलाने
पुरीत कर तू दासांतें
कर आम्हां अध्यात्मधनानें
धनिक ईश्वरा दीनातें ... २
श्रद्धा, आशा, प्रेम, नम्रता,
सहनशीलता, पवित्रता
दे दे सदया संपत्ती हि,
अनन्य तूं विश्वी दाता
स्वयें साहुनी मृत्यूवेदना
तयारी अवघ्या जगतातें
अधिकाधिक बिलगावें आमहीं
त्या प्रभू येशू ख्रिस्तातें ... ३
वधस्तंभयुक्तरहस्य आम्हां
पूर्णपणें दिसूनीं यावें,
तुवां आमुच्या नयनी अंजन
यास्तव बापा घालावें,
सन्मुख तुजला न्याय,
तवासन सत्यदयालिंगीतरमते
अविनाशी तव राज्य सनातन
दिक्कालाहून विस्तृत तें ... ४
-------------- एच. जे. ब्रूस