मराठी
७६७. मायवार
धन्य धन्य मायवार आई मानितों आभार ... ध्रु
पाजूनिया प्रेमधार वाढविलें मातें थोर
फेडून कैसे उपकार शिरीं झाले ओझे फार ... १
रोज दुःख ये आजार होशी तेव्हां तू बेजार
वाणी ऐकुनियां दूर धावतसे जैशी धार ... २
आई नामाचा उच्चार भय संकटी आधार
कष्ट लागतांची घोर आई आई मुखोद्गगार ... ३
तुझ्या पायिं हा संसार भासे सौख्याचा सागर
स्वर्गी माझें देवधर आई जगिं तूं माहेर .. ४
-------- वामन स. निर्मळकर